भाग्यवान वेड्यांची दुनिया…

पुस्तकांवरील पुस्तके म्हणजे बुक्स अबाउट बुक्स हा एक अत्यंत रमणीय साहित्यप्रकार आहे. वाचनाचे वेड असलेल्यांना तसेच पुस्तकांबद्दल व एकूणच ग्रंथव्यवहाराबद्दल आस्था असलेल्यांना अशी पुस्तके वाचण्यात एक अवर्णनीय आनंद मिळत असतो. इंग्रजीमध्ये अशी बुक्स ऑन बुक्स अनेक आहेत. पण मराठी मध्ये अगदी आता-आतापर्यंत अशा प्रकारच्या पुस्तकांची वानवा होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मराठीतल्या काही चोखंदळ व व्यासंगी वाचकांनी आपल्या वाचनाबद्दल, वाचनानंदाबद्दल तसेच एकंदरीत ग्रंथव्यवहाराबद्दल पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये निरंजन घाटे यांचे ‘वाचत सुटलो त्याची गोष्ट’, सतीश काळसेकरांचे ‘वाचणार्‍याची रोजनिशी’, नितीन रिंढे यांचे ‘लीळा पुस्तकांच्या’, निखिलेश चित्रे यांचे ‘आडवाटेची पुस्तके’ अशासारख्या पुस्तकांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. तत्पूर्वी गोविंदराव तळवलकर, अरुण टिकेकर यासारख्या व्यासंगी विद्वानांनी आपापल्या ग्रंथप्रेमाबद्दल व वाचनानंदाबद्दल लिहिले होते. गोविंदराव तळवलकर यांची ‘वाचता-वाचता’, सौरभ भाग १ व २ तसेच अरुण टिकेकर यांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’ ही अत्यंत वाचनीय पुस्तके आजही आपली लोकप्रियता टिकवून आहेत. या पुस्तकांमध्ये आणखी एका दुर्मिळ पुस्तकाचा समावेश करावा लागेल. ते पुस्तक म्हणजे भानू शिरधनकर यांचे ‘पुस्तकांची दुनिया’ हे होय. साहस कथा व शिकार कथा लिहिणारे जुन्या पिढीतील सुप्रसिद्ध लेखक व पट्टीचे वाचक असलेले भानू शिरधनकर आता विस्मृतीत गेले आहेत. परंतु शिरधनकर जरी मुख्यतः साहसकथा व शिकारकथा लिहिणारे लेखक असले तरी मुळात ते एक अत्यंत चोखंदळ व व्यासंगी वाचक व ग्रंथप्रेमी होते. त्यांनी १९६७ साली पुस्तकांची दुनिया हे एक अप्रतिम असे पुस्तकांवरील पुस्तक लिहिले. आता हे पुस्तक दुर्मिळ व आउट ऑफ प्रिंट झाले आहे. पण सुदैवाने या पुस्तकाची एक पीडीएफ इंटरनेटवर मला मिळाली.

शिरधनकरांचे ग्रंथप्रेम इतके पराकोटीचे होते की त्यांनी केवळ ग्रंथप्रेमापोटी हौस म्हणून ग्रंथालयशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केला. पुस्तकांची दुनिया या पुस्तकात त्यांनी एकूणच ग्रंथव्यवहार, ग्रंथांची घ्यावयाची काळजी तसेच स्वतःचे वाचन याबद्दल लिहिले आहे. परंतु विशेष म्हणजे अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक, विद्वान व थोर महापुरुषांच्या वाचनप्रेमाबद्दल व व्यासंगाबद्दल सुद्धा त्यांनी अत्यंत दुर्मिळ, उपयुक्त आणि मनोरंजक अशी माहिती दिली आहे. त्यांच्या पुस्तकाचे मुख्यतः दोन भाग करता येतात. एका भागात त्यांनी सर्वसाधारण ग्रंथव्यवहार, ग्रंथालये, ग्रंथांची घ्यावयाची काळजी याबद्दल तसेच स्वतःच्या वाचनवेडाबद्दल व आपण केलेल्या ग्रंथसंग्रहाबद्दल लिहिले आहे व दुसऱ्या भागात त्यांनी अनेक प्रसिद्ध साहित्यिक व विद्वानांच्या ग्रंथ प्रेमाबद्दल, वाचनाच्या सवयींबद्दल व वाचनशैलीबद्दल लिहिले आहे.

या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे पुण्यात एके काळी सुप्रसिद्ध असलेले जुन्या व दुर्मिळ ग्रंथांचे विक्रेते श्री ढमढेरे यांची मुलाखत होय. एक स्वतंत्र प्रकरण म्हणून ही मुलाखत शिरधनकरांनी आपल्या पुस्तकात छापली आहे. ‘वाळूतील सुवर्णकण’ असे सार्थ शीर्षक या प्रकरणाला त्यांनी दिले आहे. १९५१ पासून ढमढेरे यांनी जुन्या पुस्तकांचा व्यवसाय करायला सुरुवात केली. या व्यवसायात ते कसे पडले, अनेक दुर्मिळ व जुने ग्रंथ त्यांनी कसे मिळविले आणि कोणकोणत्या प्रसिद्ध व्यक्तींना त्यांनी ते पुरविले याची अत्यंत मनोरंजक व यापूर्वी कधीही प्रकाशात न आलेली माहिती या प्रकरणातून आपल्याला मिळते.

‘आपल्याला वाचायला आवडेल, परंतु वाचायला वेळच मिळत नाही’, अशी अनेकांची तक्रार असते. मात्र ही तक्रार कशी चुकीची आहे व रोजच्या रामरगाड्यातून थोडा थोडा वेळ जरी आपण काढला तरी एक माणूस आपल्या आयुष्यात किमान हजार-दीड हजार पुस्तके सहज कशी वाचू शकतो यावरही शिरधनकरांनी सप्रमाण लिहिले आहे.

अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ग्रंथप्रेमाचे मनोरंजक किस्से आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतात. यात काहींचे ग्रंथप्रेम तर इतके पराकोटीचे होते की त्यासाठी त्यांनी चोरी सुद्धा केली आहे. आगाखान हे लहानपणापासूनच ग्रंथप्रेमी व पट्टीचे वाचक होते. त्यांची वाचनाची भूक एवढी जबर होती की घरातली सर्व पुस्तके वाचून संपवल्यानंतर आता पुस्तके कुठून आणायची याचा त्यांना प्रश्न पडत असे. लहान असल्यामुळे घरून पुस्तकांसाठी पैसे मिळण्याचा संभव नव्हता. त्यामुळे आगाखान व त्यांचे बंधू हे मोठे झब्बे घालून एका पुस्तकाच्या दुकानात जात असत व हवी ती पुस्तके चोरून त्यात लपवून ते आणीत असत आणि आपली वाचनाची भूक भागवीत असत. एकदा ही चोरी पकडली गेली व त्याबद्दल आगाखान यांना त्यांच्या चुलत्याने केलेली शिक्षा सुद्धा भोगावी लागली. मात्र त्यानंतर त्यांना पुस्तके विकत घेण्यासाठी ठराविक रक्कम घरून मिळू लागली. हे व असे अनेक मनोरंजक किस्से या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींचे, थोर साहित्यिकांचे वाचन कशा प्रकारचे होते, त्यांचा व्यासंग त्यांनी कसा वाढविला याबद्दल सुद्धा अतिशय प्रेरक व मनोरंजक माहिती शिरधनकर देतात. अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींच्या ग्रंथप्रेमाचे किस्से या पुस्तकात आले आहेत. त्यात न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग, सर नारायणराव चंदावरकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ चिंतामणराव देशमुख, डॉ वि भि कोलते, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, सर विन्स्टन चर्चिल, श्री गोळवलकर गुरुजी, महाराज सयाजीराव गायकवाड, आचार्य धर्मानंद कोसंबी, संस्कृत पंडित डॉ के ना वाटवे, श्री म माटे, विठ्ठलराव घाटे, वि स खांडेकर, यासारख्या महापुरुषांचा व थोर साहित्यिकांचा समावेश आहे. अशा महापुरुषांचा व्यासंग, त्यांचे वाचनप्रेम, त्यांचे ग्रंथप्रेम याबद्दल वाचून अवर्णनीय आनंद तर मिळतोच, परंतु आपल्यालाही प्रेरणा मिळते. डॉ बाबासाहेब आंबेडकर आपण घरात असू तेथे हवे ते पुस्तक सहज हाती पडावे म्हणून एकेका पुस्तकाच्या पाच-पाच प्रती विकत घेत. भाऊसाहेब खांडेकर तर औषधे आणायला म्हणून निघत ते पुस्तके घेऊन परत येत. मग औषधांचीही गरज उरत नसे. आवडत्या पुस्तकाच्या सान्निध्यातच प्रकृती बरी होत असे. या सर्व थोर पुरुषांनी केवळ वाचायचे म्हणून वाचले नाही, तर आपल्या वाचनाचा व व्यासंगाचा आपल्या जीवनात सार्थ उपयोगही करून घेतला. यासंबंधी अनेक रंजक गोष्टी शिरधनकरांनी आपल्या पुस्तकात दिल्या आहेत. या पुस्तकाला सिद्धार्थ महाविद्यालयाचे तत्कालीन ग्रंथपाल व सुप्रसिद्ध व्यासंगी ग्रंथप्रेमी शा. शं. रेगे यांची प्रस्तावना लाभली आहे. आता हे पुस्तक दुर्मिळ झाले आहे. परंतु मराठीत पुस्तकांवरील पुस्तके या प्रकारात शिरधनकर यांच्या या पुस्तकाचे नाव सन्मानपूर्वक घ्यावे लागेल इतके हे पुस्तक उत्तम आहे. याची छापील आवृत्ती निघाल्यास सर्व ग्रंथप्रेमींसाठी ती एक पर्वणी ठरेल यात शंका नाही. हे पुस्तक इंटरनेटवर archive.org या वेबसाईटवर PDF स्वरूपात उपलब्ध आहे. ते सहज डाऊनलोड करून वाचता येईल.

मनोरंजनाच्या उथळ साधनांनाच ज्ञानाचे व आनंदाचे स्त्रोत समजण्याच्या आणि सांस्कृतिक कुपोषणाच्या या काळात हाती आवडते पुस्तक घेऊन भोवतालच्या जगाला विसरून त्यात गढून जाण्यात काय अवीट आनंद असतो याची नवीन पिढीला (व त्यांच्या आईवडिलांनाही) जाणीव करून देणारी अशी पुस्तके आणखी खूप हवी आहेत.

पुस्तकांची दुनिया

भानू शिरधनकर

अभिनव प्रकाशन, १९६७

https://archive.org/details/in.ernet.dli.2015.310180

नैराश्याशी लढतांना …

WHEN ALL IS NOT WELLनुकतेच ओम स्वामी यांचे When All is Not Well: Depression, Sadness and Healing: A Yogic Perspective हे पुस्तक वाचून संपवले. ओम स्वामी हे एक संन्यासी आहेत. संन्यास घेण्यापूर्वी ते एका मोठ्या बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीचे मालक होते. संन्यास घेतल्यानंतर त्यांनी हिमालयाच्या कुशीत आपला एक आश्रम स्थापित केला व सध्या ते तिथेच वास्तव्यास आहेत. मुळात ते उच्चशिक्षित आहेत. लोकांना ते ध्यान, साधना याविषयी तसेच त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयीदेखील मार्गदर्शन करतात. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील प्रमुख ही ध्यानधारणा, निरामय जीवन, नैराश्य व त्यावरील उपाय, मंत्रांची शक्ती, गायत्री मंत्र या व अशा विषयांवर आहेत. When All is Not Well, The Wellness Sense, The Power of Gayatri Mantra, A Million Thoughts, The Ancient Science of Mantras ही त्यांची काही पुस्तके.

When All is Not Well हे मी वाचलेले त्यांचे पहिलेच पुस्तक. प्रस्तुत पुस्तक हे नैराश्य आणि त्यावर मात करण्याचा योगिक दृष्टीकोण यावर आहे. पुस्तकाच्या सुरुवातीलाच ओम स्वामी आपल्याला त्यांच्या परिचयाच्या काही नैराश्यग्रस्त व्यक्तींची उदाहरणे देतात. मात्र त्यापूर्वी ते नैराश्य म्हणजे नेमकं काय आणि नैराश्य व सामान्य दु:ख किंवा अपेक्षाभंग यांतला फरक काय हे स्पष्ट करतात आणि त्यानंतर त्यांच्याकडे मदतीसाठी आलेल्या काही व्यक्तींच्या नैराश्याची उदाहरणे देतात. या व्यक्तींपैकी काहींच्या नैराश्याची मुळे ही त्या व्यक्तींच्या खडतर व दु:खमय पूर्वायुष्यात होती, पण काही स्वप्नवत सुखी आयुष्य जगलेल्यानाही नैराश्य कसे छळते याचीही उदाहरणे ते आपल्याला देतात. त्यानंतर ते सौम्य नैराश्य, तीव्र नैराश्य व सामान्य उदासीनता यातील फरक स्पष्ट करतात. यानंतर नैराश्याच्या स्थितीत मेंदूत होणारे रासायनिक बदल व त्यावर दिली जाणारी औषधे यांबद्दल अत्यंत महत्वपूर्ण व शास्त्रीय माहिती देऊन ही औषधे अनेकदा आवश्यक असली तरीही केवळ त्यांच्याच मदतीने नैराश्यावर पूर्ण मात करणे कसे शक्य नाही आणि यासाठी सर्वंकष (holistic) उपाययोजना कशी आवश्यक आहे हेही ते पटवून देतात. यामध्ये जीवनशैलीतील बदल, युक्त आहार-विहार, व्यायाम, वाचन, सकारात्मक दृष्टीकोनाची जोपासना तसेच विविध योगिक उपाय यांची सविस्तर माहिती ते शेवटच्या काही प्रकरणात देतात.

अन्न हे acidic (आम्लीय) व alkaline (क्षारीय) अशा दोन मुख्य प्रकारचे असते. त्यातही आम्लीय पदार्थ खाल्ल्याने नैराश्य येण्यास अथवा वाढण्यास मदत होते तर क्षारीय पदार्थ खाल्ल्याने नैराश्यावर लवकर मात करता येते असेही मत ओम स्वामी सप्रमाण मांडतात. मेंदूतील संदेशवहन कार्यक्षम रीतीने होण्यासाठी उपयुक्त असलेली रसायने – म्हणजेच न्यूरोट्रान्समीटर्स (उदा. सिरोटोनिन, डोपामाईन, इत्यादी) यांचे योग्य संतुलन राहण्यासाठी कोणता आहार योग्य आहे याचेही उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात केले आहे. विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाचे प्रकार तसेच नैराश्यावर मात करण्यासाठी त्यांचे महत्व व उपयुक्तता यांचेही सविस्तर विवेचन लेखकाने केले आहे.

या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पदोपदी (साधारणत: प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला) प्रेरक कथांच्या द्वारे आपला जीवनविषयक दृष्टीकोण स्वच्छ व नितळ करण्याचा प्रयत्न केला आहे. या कथा वाचून आपण अंतर्मुख होतो व आपल्याला दिशा मिळते.

नैराश्याचा बाबतीतली सर्वात घातक गोष्ट म्हणजे नैराश्याचे अचूक निदान लवकर होतच नाही. नैराश्यग्रस्त व्यक्ती किंवा त्याचे आप्त नैराश्याची लक्षणे लवकर ओळखू शकतच नाहीत. अनेकदा आपल्या डॉक्टरांनासुद्धा नैराश्याचे निदान करण्यात अपयश येते. मात्र प्रस्तुत पुस्तकात लेखकाने नैराश्याला ओळखण्याची स्पष्ट व शास्त्रीय लक्षणे दिली आहेत. एवढेच नव्हे तर सामान्य दु:ख किंवा उदासीनता व नैराश्य यातील फरक कसा ओळखावा ते सुद्धा स्पष्ट करून सांगितले आहे. नैराश्य किंवा विषाद ही मनाची तामसिक अवस्था असून हा आजार सनातन आहे. मात्र आजच्या निसर्गविपरीत, अतिमहत्त्वाकांक्षी व भोगलोलूप जीवनशैलीमुळे तो आज एखाद्या महामारी प्रमाणे बळावला आहे. अतिमहत्त्वाकांक्षा, त्यापाठोपाठ येणारे भय व अपयश, यातून शेवटी उरतो तो भयंकर विषाद. यावर उपाय एकच-अधिकाधिक साधे, निसर्गानुकूल व सश्रद्ध आयुष्य जगणे. नेमकी हीच गोष्ट ओम स्वामी नावाच्या या तेजस्वी, तरुण संन्याशाने आपल्या या १८८ पानांच्या साध्या, सोप्या व सुंदर इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकातून सांगितली आहे. नवे काही शोधू पाहणाऱ्यांना या पुस्तकात फारसे काही सापडणार नाही कदाचित. पण नैराश्यावर मात करण्याचा मार्ग एकच आहे, तो प्राचीन व सनातन आहे, आणि त्याचेच पुनःपुन्हा उच्चारण व आचरण करणेच इष्ट आहे हे निश्चित.

ओम स्वामीं बद्दल, त्यांच्या विचारांबद्दल व त्यांच्या पुस्तकांबद्दल www.omswami.com या त्यांच्या संकेतस्थळावरूनही जाणून घेता येईल.

When All is Not Well: Depression, Sadness and Healing: A Yogic Perspective

Om Swami. HarperCollins India. Rs. 299/- ISBN: 9789351777267

एवढी पुस्तकं वाचणार कधी?

पाच-सातशे पुस्तके असतील माझ्या संग्रहात फारतर. पण माझी अभ्यासिका भरायला तेवढीही पुरेशी आहेत. तेवढीच पुस्तके पाहून लोक मला विचारतात- “एवढी सगळी पुस्तकं तुम्ही वाचली आहेत?” कोणी म्हणतं- “एवढी पुस्तकं तुम्ही वाचणार कधी?”

त्यांच्या परीने त्यांचे प्रश्न बरोबर आहेत पण त्यांना काय सांगावं हाच मला प्रश्न पडतो. पुस्तकं का जमवायची, किती जमवायची, का वाचायची आणि वाचून काय करायचं- हे प्रश्न ज्या पिढीला पडतात तिच्या सांस्कृतिक पातळी बद्दल न बोललेलंच बरं. मला ओरडून सांगावेसे वाटते- “बाबांनो, मला आवडतं, आनंद होतो म्हणून मी वाचतो. पुस्तकांचा सहवास, स्पर्श, त्यांचा गंध, हे सर्व आवडतं मला. आणि मुख्य म्हणजे खामगाव सारख्या छोट्या शहरात मला हवी असलेली किंवा नवीन अशी इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत पुस्तकं उपलब्ध करून देणारं समृद्ध ग्रंथालय नाही. मग पुस्तक विकत घेण्याशिवाय पर्याय नसतो. आणि ग्रंथालय असतं तरी मी पुस्तकं विकत घेऊनच वाचली असती. कारण चांगली पुस्तकं म्हणजे संपत्ती आणि संपत्ती स्वतःची असली तरच तिचा मनसोक्त उपभोग घेता येतो आणि तिची ऐट मिरवता येते. माझ्या वाचनाचा वेग माझ्या पुस्तक खरेदीच्या वेगापेक्षा अर्थातच कमी आहे. तसा तो सर्वच ग्रंथाप्रेमींचा असतो. मी कुठेतरी वाचलं होतं कि माणूस आयुष्यभरात सहा-सात हजार पुस्तकं वाचू शकतो. हे खरं असेल तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जवळपास ४४०००, डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जवळजवळ ४०००० आणि त्याहून वरचढ म्हणजे टाइम्स ऑफ इंडियाचे माजी संपादक श्यामलाल यांनी तब्बल नव्वद हजारांच्या वर पुस्तकं जमवली होतीच ना? पाश्च्यात्यांचे ग्रंथप्रेम तर आपल्यापेक्षा खूप जास्त आणि खूप श्रेष्ठ प्रतीचे आहे. त्यांच्याकडे तर अशी उदाहरणे खो-यांनी सापडतील. उम्बर्तो इको या इटालियन समीक्षकाकडे तीस हजारांचा समृद्ध ग्रंथसंग्रह होता. निस्सीम तालेब हा लेखक न वाचलेल्या पुस्तकांना anti-library म्हणतो. असा समृद्ध ग्रंथसंग्रह आजूबाजूला असला म्हणजे माणूस सतत एका अभिरुचीसंपन्न सहवासात व सुखावह अशा वातावरणात असतो. आपल्याला अनेक गोष्टी माहीत नाहीत, अनेक क्षेत्रे आपल्यासाठी अज्ञात आहेत, अनेक पुस्तके आपल्याला अजून वाचायची आहेत याचे भान त्याला सदैव असते. आपल्या अज्ञानाची जाणीव त्याला सावध ठेवते. मनाला कोतेपण येऊ देत नाही.

आता राहिला प्रश्न वाचून काय करायचं हा. तर काही साध्य करण्यासाठीच वाचावं असं काही नसतं आनंदासाठीही वाचायचं असतं. आजच्या जगात निखळ आनंदासाठी सुद्धा काही करायचं असतं ही कल्पनाच लोकांना करवत नाही. वाचणे, संगीत ऐकणे, मित्रांमध्ये रमणे, निसर्गात रमणे या आणि अशा गोष्टी केवळ आनंदासाठी करायच्या असतात ही कल्पनाच आपल्या पिढीच्या लोकांसाठी अपरिचित आहे. निखळ आनंदासाठी वाचावे. इतर साध्य तर असतातच मग. कधी संशोधनासाठी, कधी माहितीसाठी, कधी लिहिण्यासाठी, कधी एखाद्या विषयाचा विशेष अभ्यास करण्यासाठी वाचावं लागतंच. पण सर्वोच्च व अभिजात स्वरूपाचा आनंद मिळतो तो अहेतुक वाचनातून. कोणाला हा आनंद कथा-कादंबऱ्यातून मिळेल, कोणाला कवितेतून, नाटकातून किंवा इतर ललित साहित्यातून मिळेल किंवा कोणाला इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान, विज्ञान किंवा राजकारणाबद्दल वाचून मिळेल. त्यांची जातकुळी मात्र सारखीच. मला हे कळतं की मी कदाचित आयुष्यात जमवलेली सर्वच पुस्तकं वाचू शकणार नाही. पण तरीही मी पुस्तकांचा संग्रह करणे सोडणार नाही. ज्याप्रमाणे आपण श्वासांचा हिशेब मांडून ठेवत नाही, तसा वाचनातून होणाऱ्या नफा-नुकसानीचा ही ताळेबंद मांडू नये. निखळ आनंदासाठी करावयाच्या ज्या गोष्टी असतात त्या हिशेबाच्या पलीकडे असतात. त्यांना हिशेबाच्या पलीकडेच ठेवावे. आणि हो, हा आनंद वाटायला विसरू नये. वाटल्याने तो शतपटीने वाढतो.

प्रज्ञावंताच्या सहवासात…

sangatनरहर कुरुंदकरांनी महाराष्ट्राला विचार करायला शिकवले. हा असामान्य प्रतिभावंत, प्रज्ञावंत महाराष्ट्राच्या वैचारिक क्षितिजावर जवळजवळ पस्तीस वर्षे तेजाने तळपला आणि अकाली अस्ताला गेला. साहित्य, कला, राजकारण, इतिहास, धर्म, तत्त्वज्ञान या सर्वच क्षेत्रांमध्ये सहज व अव्याहत संचार करणारी मूलगामी चिकित्सक बुद्धी नरहर कुरुंदकरांना लाभली होती. कोणताच विषय त्यांना वर्ज्य नव्हता. त्यांच्या बुद्धिमत्तेची कक्षा स्तिमित करणारी आहे.

कुरुंदकर गुरुजींचे विचारधन त्यांच्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध आहेच, पण गेल्या काही वर्षात कुरुंदकरांचे काही अप्रकाशित लिखाणसुद्धा प्रकाशित होत आहे, ही आनंदाची बाब आहे. कुरुंदकर यांचे चिरंजीव विश्वास कुरुंदकर यांनी ‘निवडक नरहर कुरुंदकर’ या शीर्षकाची एक ग्रंथमाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली आहे या ग्रंथ माले तले ‘निवडक नरहर कुरुंदकर : व्यक्तिवेध’ तसेच ‘ग्रंथवेध भाग १ व २’ हे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. यातच नरहर कुरुंदकरांचे मित्र व सहाध्यायी मधु कुरुंदकर यांनी लिहिलेल्या ‘संगत नरहरची’ या दुर्मिळ झालेल्या ग्रंथाच्या नव्या आवृत्तीची भर पडली आहे. ‘संगत नरहरची’ हे पुस्तक मधु कुरुंदकरांनी सर्वप्रथम १९९४ मध्ये लिहिले व ते संगत प्रकाशन, नांदेड यांनी प्रकाशित केले. त्यानंतर २००३ साली या पुस्तकाची वाढीव व सुधारित अशी दुसरी आवृत्ती स्वतः लेखकानेच सत्संगत प्रकाशन या स्वतःच्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून प्रकाशित केली. ही आवृत्ती संपून बरीच वर्षे झाली होती व हे पुस्तक दुर्मिळ झाले होते. तसेही प्रकाशनात असतानासुद्धा ते बृहन्महाराष्ट्रातील सर्व कुरुंदकरप्रेमींपर्यंत पर्यंत पोचू शकले नव्हते. आता मात्र साधना प्रकाशनाने या पुस्तकाची नवी आवृत्ती प्रकाशित केली आहे.

पहिल्या आवृत्तीला प्राचार्य राम शेवाळकर यांनी लिहिलेली प्रस्तावना याही आवृत्तीत आहे. प्रस्तावनेमध्ये प्राचार्य शेवाळकरांनी या पुस्तकातील अनेक आठवणी आपल्यालाही आधी ज्ञात असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पुस्तकाची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. मधु कुरुंदकर हे नरहर कुरुंदकरांचे आप्त तसेच सहाध्यायी व मित्र. बालपणापासून दोघे सोबत खेळले, वाढले. मॅट्रिकच्या अभ्यासासाठी म्हणून मधु कुरुंदकर यांना नरहर कुरुंदकरांसोबत हैदराबाद येथे शिकण्याचा व राहण्याचा योग आला. इथून पुढे जवळजवळ शिक्षण पूर्ण होईपर्यंत दोघे सोबत होते. एक विद्वान, विचारवंत व प्रतिभावंत म्हणून नरहर कुरुंदकर कसे घडत गेले याचे मधु कुरुंदकर हे जवळचे साक्षीदार होते. त्यामुळे नरहर कुरुंदकरांना समजून घेण्यासाठी मधु कुरुंदकरांच्या या आठवणी फार मोलाच्या आहेत. मराठवाड्यात वसमत जवळचे कुरुंदे हे दोघांचेही मूळ गाव. उन्हाळ्याच्या सुट्टीत दोघा मित्रांच्या भेटी होत. दोघेही समवयस्क होते. इतर समवयस्क मित्रांच्या संगतीत खेळ व गप्पांना उधाण येई. लहानपणापासूनच नरहरीला वक्तृत्वाचे व अभ्यासाचे देणे लाभले होते. अनेकविध विषयांवर नरहरी चे मजेदार मूलगामी प्रगल्भ विवेचन (किंबहुना रसाळ निरुपण) सतत सुरू असे. ते ऐकताना समवयस्क मित्रच नव्हे तर गावातले वडीलधारे सुद्धा गुंग होऊन जात. पुढे मधु कुरुंदकर मॅट्रिकची परीक्षा नापास झाले त्यावेळी नरहर कुरुंदकर हेही मॅट्रिकची परीक्षा नापास झाले होते. नरहर कुरुंदकर हैदराबादला आपले मामा डॉक्टर नारायणराव नांदापूरकर यांच्याकडे शिकायला होते. त्यांनी आग्रह करून आपल्याबरोबर मधु कुरुंदकरांनाही हैदराबादला शिकायला नेले व इथूनच दोघांचे अगदी घनिष्ठ साहचर्य सुरू झाले.

हैदराबादला सिटी कॉलेजमध्ये शिकत असताना नरहरीचे चौफेर वाचन व व्यासंग सुरू होता. अभ्यासाकडे त्याचे फारसे लक्ष नसे. सतत व्यासंग, विद्वानांचा संग व त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा यातून नरहर कुरुंदकरांमधला विद्वान घडत गेला. अगदी लहान वयापासूनच नरहर कुरुंदकर किती अफाट वाचन आणि व्यासंग करीत व मोठमोठ्या विद्वानांना सुद्धा कसे प्रभावित व चकित करीत याचे अनेक किस्से मधु कुरुंदकरांनी या पुस्तकात सांगितले आहेत. मुळातच कुशाग्र असलेल्या नरहर कुरुंदकरांच्या बुद्धीला पैलू पाडण्याचे व त्यांच्या व्यासंगाला दिशा देण्याचे काम कुरुंदकर यांचे मामा डॉक्टर नांदापूरकर तसेच मराठीतले नामांकित विद्वान प्राध्यापक भालचंद्र महाराज कहाळेकर यांनी केले. हैदराबादच्या सिटी कॉलेजचे ग्रंथालय, आंध्र स्टेट लायब्ररी यासारख्या ग्रंथालयात मधल्या तसेच आपल्या मामांच्या ग्रंथसंग्रहातल्या मोठमोठ्या भक्कम ग्रंथांचा अगदी कमी वयात नरहर कुरुंदकरांनी फडशा पाडला होता. इंटरच्या वर्गापासून मात्र दोघा मित्रांचे मार्ग वेगळे झाले. मधु कुरुंदकर हे औरंगाबादला शिकायला गेले तर नरहर कुरुंदकर हैदराबादलाच शिकत राहिले. इथून दोघा मित्रांमध्ये काहीसा औपचारिक दुरावा आला, पण अंतरीची ओल मात्र कायम राहिली. पुढे नोकरीच्या निमित्ताने मधु कुरंदकर नांदेडला आले व एका खाजगी शाळेत शिक्षकाची तात्पुरती नोकरी करू लागले. त्यांनी ही नोकरी सोडल्यावर याच जागेवर नरहर कुरुंदकर यांची नेमणूक झाली. अशाप्रकारे दोघा मित्रांनी नांदेड येथेच आपापले संसार थाटले. नरहर कुरुंदकर पुढे पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक व नंतर प्राचार्य झाले आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षितिजावर तेजाने तळपू लागले. तरीही आपल्या मैत्रीला ते ससतत जागले. पूर्वीइतकी सलगी आता शक्य नसली तरी दोघे मित्र एकमेकांना प्रेम व आधार देत असत.

वक्ते व विद्वान म्हणून नरहर कुरुंदकर यांची ख्याती कशी पसरत गेली यासंबंधी अनेक रम्य आठवणी मधु कुरुंदकर यांनी सांगितल्या आहेत. त्याचप्रमाणे एक तत्वनिष्ठ विचारवंत तसेच विद्यार्थीप्रिय व कर्तव्यदक्ष प्राध्यापक व प्राचार्य म्हणून नरहर कुरुंदकरांचे आचरण किती काटेकोर असे यासंबंधीही अनेक आठवणी यात आहेत. नरहर कुरुंदकरांच्या कर्तबगारीचा आलेख असा चढत जात असतानाच वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी व्यासपीठावरच औरंगाबाद येथे हृदयविकाराच्या आकस्मिक झटक्याने त्यांचे निधन झाले. आपल्या मित्राच्या निधनाचे मधु कुरुंदकरांनी केलेले वर्णन अतिशय चटका लावणारे आहे. ते वाचताना आपल्यालाही गहिवरून येते.

पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात नरहर कुरुंदकर यांच्या काही स्फुट आठवणी सुद्धा लेखकाने दिल्या आहेत. मधु कुरुंदकर हे स्वतः कवी व ललित लेखक होते किंबहुना छापून येणारे पहिले कुरुंदकर तेच. त्यांची भाषा ओघवती आहे. आपल्या मित्रा बद्दलचा भावनिक ओलावा त्यांच्या लिखाणात पदोपदी जाणवतो. त्याच्या आठवणींनी मिळणाऱ्या स्मरणसौख्यात आपल्यालाही सहभागी करून घेण्यात लेखक यशस्वी झाला आहे. या ग्रंथाच्या पुन: प्रकाशनाच्या निमित्ताने नरहर कुरुंदकर नावाच्या थोर प्रज्ञावंतांचे पुण्यस्मरण महाराष्ट्राला घडेल व कुरुंदकरांच्या विचारधनाचा परिशीलनाला नव्याने चालना मिळेल यात शंका नाही.

संगत नरहरची  – मधु कुरुंदकर , साधना प्रकाशन, पुणे  (मूल्य २०० रुपये. )